कजगाव परिसरात चोरीचे सत्र सुरूच-तूर व दोन बकऱ्या लंपास.!!!
भडगाव ता.प्रतिनिधी आमीन पिंजारी
कजगाव परिसरात चोरीच्या घटनांना उधाण आले असून, शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आडत व्यापारी रामकृष्ण दयाराम वाणी यांच्या पिंप्री शिवारातील गोडाऊनमधून सुमारे ५० हजार रुपये किमतीची तुरदाळ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. हे गोडाऊन कजगाव-नागद मुख्य रस्त्यालगत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
त्याचप्रमाणे, दिनांक ७ रोजी सावता माळी चौक येथील रहिवासी शाकीर इस्माईल मन्यार यांच्या अंगणातून २५ हजार रुपये किमतीच्या दोन बकऱ्या अज्ञात व्यक्तींनी लंपास केल्या. या दोन्ही घटनांमुळे शेतकरी व पशुपालक वर्गात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
कजगाव परिसरात यापूर्वीही अशा अनेक चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. मात्र, एकाही चोरीचा तपास पोलीस यंत्रणेला लागलेला नाही, ही बाब गंभीर आहे. येथील पोलीस मदत केंद्रात कोणताही पोलीस कर्मचारी नियमित राहत नसल्याने ते केवळ नावापुरते उरले आहे. येथे केवळ एखाद्या प्रसंगीच पोलीस येतात, हे वास्तव असून, त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे.
या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि नागरिकांकडून या पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची जोरदार मागणी होत आहे. अन्यथा येथील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.