परी महाडिकचं सुवर्ण यश : रोहाच्या कन्येची झळाळती कामगिरी.

0 40

परी महाडिकचं सुवर्ण यश : रोहाच्या कन्येची झळाळती कामगिरी.

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) – रायगड जिल्ह्यातील रोहा शहरातील कु. परी रुपेश महाडिक हिने नेपाळमधील काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्या एशियन मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उज्वल केलं आहे.

परी ही डॉ. गोविंद राजे इंग्लिश मिडियम स्कूल, रोहा येथील इयत्ता सहावीतील विद्यार्थीनी असून ती गरीब व मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून येते. तिचे वडील एका खासगी कंपनीत काम करत असून आई गृहिणी आहे. तिची मोठी बहीण दहावीत शिक्षण घेत आहे. चार सदस्यांच्या कुटुंबातून येऊन परीने जिद्द, चिकाटी व सातत्याच्या बळावर ही झळाळती कामगिरी गाजवली आहे. ती खऱ्या अर्थाने उगवती आणि प्रेरणादायी खेळाडू ठरली आहे.

परीने यापूर्वीही विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळवले आहे. ठाणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत, माणगावच्या जिल्हास्तरीय, धाटावच्या तालुकास्तरीय, दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आणि आता नेपाळमधील आशियाई स्तरावरील स्पर्धेत तिने सुवर्णपदके पटकावली आहेत. तिच्या या भरीव कामगिरीची दखल घेऊन इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे, ही गोष्ट रोहावासीयांसह सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

या सुवर्ण विजयानंतर अखिल भारतीय मराठा महासंघ, रोहा शहर महिला विभागाच्यावतीने कु. परी महाडिक हिचा तिच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. महिला अध्यक्षा दीपा भिलारे, सरचिटणीस अश्विनी पार्टी आणि महिला संघटक प्रिया साळुंके यांनी परीचे मन:पूर्वक अभिनंदन करत तिच्या इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!