लिपिक, मुख्याध्यापिकेसह एसीबीच्या जाळ्यात; खिरोदा शाळेतील लाच प्रकरण उजेडात.!!!
रावेर प्रतिनिधी :-
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात लाचखोरीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि लिपिकाला 36 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. हे कारस्थान धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केले आहे.
नेमकं प्रकरण काय.?
तक्रारदार यांच्या सुनेने जनता शिक्षण मंडळ, खिरोदा संचालित धनाजी नाना विद्यालयात कायमस्वरुपी उपशिक्षिका म्हणून काम करत होती. तिने 2 जून रोजी प्रसूती रजेचा अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्रासह मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (वय 57) यांच्याकडे दिला.
पण रजा मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापिकेने प्रति महिना ₹5,000 प्रमाणे सहा महिन्यांच्या रजेच्या मंजुरीसाठी एकूण ₹30,000 लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने 7 जुलै रोजी धुळे एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
एसीबीने 8 जुलै रोजी सापळा रचून मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांना ₹36,000 लाच स्वीकारताना आणि कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (वय 27) याला रक्कम मोजताना रंगेहात पकडले. या प्रकरणी दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या लाचखोरीच्या प्रकारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. शिक्षकांचा सन्मान राखणाऱ्या संस्थांमध्ये असे प्रकार होणे दुर्दैवी असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.