कजगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ: एकाच रात्री चार घरफोड्या, रोकड व सोन्याचे दागिने लंपास.!!!
भडगाव ता.प्रतिनिधी :–आमीन पिंजारी
कजगाव व परिसरात चोरट्यांनी अक्षरशः कहर केला असून, २६ जूनच्या मध्यरात्रीनंतर एका रात्रीत कजगाव, पासर्डी व घुसर्डी या तीन गावांमध्ये चार घरफोड्या करत मोठ्या प्रमाणावर रोकड आणि सोन्याचे ऐवज लांबवले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रथम कजगाव येथील गजबजलेल्या राणा पॉइंट चौकात सुदर्शन भिला अमृतकर यांच्या घरावर चोरट्यांनी धाड टाकली. येथे मोठ्या प्रमाणात रोकड लांबवण्यात आली. त्यानंतर तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पासर्डी येथील भारत नगरमध्ये अर्जुन विठ्ठल पाटील यांच्या घरात घुसून चोरट्यांनी २०,००० रुपये रोख रक्कम लंपास केली.
घटनेनंतर घुसर्डी गावात दोन घरे – बळीराम हरी जाधव व निवृत्ती भास्कर देवकर – या दोघांच्या घरांमध्येही चोरी करण्यात आली. या ठिकाणी चोरट्यांनी रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा मौल्यवान ऐवज चोरून नेला.
या सलग चार घरफोड्यांमुळे चोरट्यांनी पोलिस प्रशासनालाच खुले आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही परिसरात मोटरसायकल चोरी व घरफोडीचे प्रकार घडले असून, भडगाव पोलिसांना अजूनही कोणत्याही प्रकरणाचा तपास लावण्यात यश आलेले नाही.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट: खतासाठीचे पैसेही गेले लंपास
या चोरीत काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी व खत मजुरीसाठी जपून ठेवलेली रोकडही चोरट्यांनी लांबवली आहे. परिणामी, शेती मशागत सुरू असताना त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असून, खत व मजुरीसाठी पैसा कसा जमवायचा, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तात्काळ तपासाची गती वाढवावी, अशी नागरिक व शेतकऱ्यांची जोरदार मागणी आहे.