Uncategorized

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!!

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा.महाराष्ट्र महिलांचे २७ वे, रेल्वेचे १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद,महिलांत महाराष्ट्राचा डंका, पुरुष गटात रेल्वेचे वर्चस्व.!!!

काझीपेठ तेलंगणा :

काझीपेठ येथील रेल्वे मैदानावर पार पडलेली ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरली. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने आणि तेलंगणा खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी सातत्यपूर्ण व आक्रमक खेळाच्या जोरावर अजिंक्यपद पटकावत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले, तर पुरुष गटात रेल्वे संघाने दमदार खेळ करत राष्ट्रीय विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर अवघ्या एका गुणाने २३–२२ असा थरारक विजय नोंदवत २७ वे राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले. तर पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वे संघाने महाराष्ट्रावर २६–२१ असा ५ गुणांनी विजय मिळवत १३ वे राष्ट्रीय अजिंक्यपद आपल्या नावे केले.

महिलांचा अंतिम सामना : महाराष्ट्राची दमदार झुंज

महिलांच्या अंतिम लढतीत दोन्ही संघांनी अखेरपर्यंत चुरशीची झुंज दिली. महाराष्ट्राच्या विजयात प्रियंका इंगळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत २.१० मिनिटे संरक्षण व १० गुण मिळवले. तसेच संध्या मोरे (२.४० मिनिटे संरक्षण), संध्या सुरवसे (२.३० मिनिटे संरक्षण) आणि अश्विनी शिंदे (१.२० मिनिटे संरक्षण व ४ गुण) यांनी निर्णायक भूमिका बजावली.

ओडिशाकडून अर्चना प्रधान (२.१० मिनिटे संरक्षण व २ गुण), अर्चना माझी (नाबाद १.५० मिनिटे संरक्षण), मधुस्मिता ओझा (१.४० मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि शोभाश्री सिंग (१.५० मिनिटे संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार प्रतिकार केला; मात्र शेवटच्या क्षणी महाराष्ट्राने बाजी मारली.

पुरुषांचा महाअंतिम सामना : रेल्वेची सरशी

 

पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वे संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मध्यंतराला १४–११ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही रेल्वेने आपली पकड कायम ठेवत महाराष्ट्रावर २६–२१ असा ५ गुणांनी विजय मिळवला.

 

रेल्वे संघाकडून रामजी कश्यप (नाबाद २.३० मिनिटे संरक्षण व २ गुण), महेश शिंदे, जगन्नाथ दास (१.४० मिनिटे संरक्षण व ४ गुण), अरुण गुणकी (१.३७ मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि अभिनंदन पाटील (४ गुण) यांनी चमकदार खेळ सादर केला.

महाराष्ट्राकडून अनिकेट चेंदवणकर (१.३० मिनिटे संरक्षण व ६ गुण), प्रतीक वाईकर (१.५५ मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि शुभम उतेकर (नाबाद १ मिनिट संरक्षण व २ गुण) यांनी झुंजार खेळ केला.

उपांत्य फेरीतील लढती

पुरुषांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने कोल्हापूर संघावर २९–२७ असा २ गुणांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात रेल्वेने ओडिशाचा २५–१७ असा ८ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली.

महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने दिल्ली संघावर २७–०६ असा एक डाव व २१ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. तर ओडिशाने विमान प्राधिकरण संघावर २७–१९ असा ८ गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेतील मानकरी

महिला गट :

राणी लक्ष्मीबाई पुरस्कार – संध्या सुरवसे (महाराष्ट्र)

सर्वोत्कृष्ट संरक्षक – अर्चना प्रधान (ओडिशा)

सर्वोत्कृष्ट आक्रमक – प्रियंका इंगळे (महाराष्ट्र)

 

पुरुष गट :

एकलव्य पुरस्कार – रामजी कश्यप (रेल्वे, सोलापूर)

सर्वोत्कृष्ट संरक्षक – प्रतीक वाईकर (महाराष्ट्र)

सर्वोत्कृष्ट आक्रमक – अभिनंदन पाटील (रेल्वे)

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!