
भडगाव ता.प्रतिनिधी : अमीन पिंजारी
कजगाव येथून जाणाऱ्या जळगाव–चांदवड महामार्गालगत असलेल्या गटारींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्गालगत असलेल्या गटारीवरील ढापे अनेक ठिकाणी तुटलेले, हललेले किंवा पूर्णपणे गायब असल्याने पादचारी, लहान मुले तसेच वृद्ध नागरिकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात अंधार व पाण्यामुळे तुटलेले ढापे दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही काही नागरिक घसरून पडल्याच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच महामार्गालगतच्या गटारींची गेल्या अनेक महिन्यांपासून नियमित साफसफाई करण्यात आलेली नसल्याने गटारी तुंबल्या आहेत. परिणामी सांडपाणी थेट महामार्गावर वाहत असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर साचणाऱ्या घाणेरड्या पाण्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
गटारीतील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या गंभीर समस्यांकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण आहे.
“एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून गटारीवरील तुटलेले ढापे त्वरित दुरुस्त करावेत, नवीन मजबूत ढापे बसवावेत तसेच महामार्गालगतच्या गटारींची संपूर्ण साफसफाई करून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी कजगाव येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.




Recent Comments