पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या गंभीर जखमी.अर्ध्या तासात चार हल्ले; महिलांवरही हल्ल्याचा प्रयत्न.!!!
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकांचा संताप, प्रशासनावर टीकेची झोड
.भडगाव ता.प्रतिनिधी : – आमीन पिंजारी
कजगाव शहरात गुरुवारी सायंकाळी पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने घातलेल्या थैमानामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. जैन मंदिर चौक व परिसरात अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीत कुत्र्याने केलेल्या सलग हल्ल्यांत दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या असून दोन महिलांवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे कजगावमध्ये भीती, संताप आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील फळविक्रेते अनिस मण्यार यांची आठ वर्षांची कन्या कशफिया ही नेहमीप्रमाणे क्लाससाठी जात असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. कुत्र्याने तिच्या चेहऱ्यावर ओरखडे काढत हाताला चावा घेतला. रक्तस्राव होऊन ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने कजगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले.
या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात त्याच परिसरात घरासमोर खेळत असलेल्या समृद्धी सचिन भोसले (वय ५) या चिमुकलीवर त्याच कुत्र्याने हल्ला केला. तिच्या हाताला व पायाला चावा घेतल्याने ती रक्तबंबाळ झाली. तिला तत्काळ चाळीसगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, काही अंतरावर रमाबाई धरमचंद जैन या महिलेवरही कुत्र्याने हल्ला चढविला. मात्र, नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने त्या थोडक्यात बचावल्या. याच सुमारास आणखी एका महिलेवरही कुत्र्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. दोन ते तीन तासांच्या कालावधीत तीन ते चार नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली.
कजगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तातडीने मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.
