रिंगणगाव खून प्रकरण : ३६ तासात दोघांना अटक

0 199

रिंगणगाव खून प्रकरण : ३६ तासात दोघांना अटक

एरंडोल प्रतिनिधी :-

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १४ वर्षीय अल्पवयीन तेजस गजानन महाजन याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ ३६ तासात अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी दिली.

प्राथमिक तपासानुसार, किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर तेजसवर संशयित हरदास वासकले, सुरेश खरते आणि तिसरा आरोपी रीचडिया काटोले यांनी एकत्रित हल्ला केला. मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या तेजसला काटेरी झुडपाजवळ नेण्यात आले, जिथे रीचडिया काटोलेने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत त्याचा खून केला व मृतदेह झुडुपात फेकून तिघेही फरार झाले.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी विशेष पथकाला मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील व एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला.

तांत्रिक माहितीच्या आधारे दोन्ही आरोपी फैजपूर-रावेर मार्गे मध्यप्रदेशात जात असल्याचे उघडकीस आले. फैजपूर पोलिसांच्या मदतीने पोलिस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या पथकाने हरदास वासकलेला अटक केली. तर दुसरा आरोपी सुमारे दहा किलोमीटर पायी पाठलाग करून पकडण्यात आला.

दोन्ही अटकेत असलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर २३ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिसरा आरोपी रीचडिया काटोले फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखा आणि एरंडोल पोलिसांच्या जलद कारवाईमुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!