इंस्टाग्रामवरील मेसेजचा राग अनावर; गॅरेज चालकावर धारदार शस्त्राने हल्ला.!!!
भडगाव प्रतिनिधी :–
भडगाव शहरातील बाळद रस्त्यावर एका गॅरेज चालकावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवरील एका मेसेजवरून राग आल्याने हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे.
गंभीर जखमी झालेला गॅरेज चालक सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, पोलीस तपास सुरू आहे.
घटनेचा तपशील:
फिर्यादी महेश विश्वनाथ पाटील (वय २७, रा. बाळद बु., ता. पाचोरा) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे बाळद रस्त्यावर गॅरेज आहे. आज सकाळी १०.१५ वाजता ते गॅरेजवर काम करत असताना, बाळद खुर्द येथील विवेक शंकर कोळी (रा. बाळद खु., ता. भडगाव) हा अचानक तिथे आला आणि त्याने हातातील धारदार चाकूने महेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि मांडीवर वार केले. शिवाय, “आज तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिली.
हल्ल्यामागील कारण:
महेश पाटील यांनी सांगितले की, विवेक कोळीचा भाऊ प्रविण कोळी आणि त्याची पत्नी योगिता कोळी यांच्यात काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर योगिता कोळी ही आपल्या मुलींना घेऊन माहेरी गेली होती. नंतर प्रविणने मुलींना पुन्हा आपल्या घरी आणले. त्यासंदर्भात योगिता कोळी हिने महेश पाटील यांच्याशी फोन व इंस्टाग्रामद्वारे संपर्क साधला होता.
हे मेसेज विवेक कोळी याच्या लक्षात आल्याने त्याने रागाच्या भरात गॅरेजवर येऊन हल्ला केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल:
या प्रकरणी विवेक शंकर कोळी विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ११८(१), ११८(२), ३५२, ३५१(२) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी हे करत आहेत.