पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला; चौघे आरोपी मुद्देमालासह अटकेत.!!!
प्रतिनिधी –चोपडा
जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असताना, चोपडा तालुक्यातील हातेड येथील युग पेट्रोल पंपाजवळ दरोड्याचा प्रयत्न चोपडा ग्रामीण पोलिसांनी वेळीच हाणून पाडत चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ३ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील असा :
हातेड (ता. चोपडा) येथील युग पेट्रोल पंपाजवळ काही दरोडेखोर दोन दुचाकींवर येणार असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कविता कमलाकर यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले.
२८ मे रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून सोनू चक्कर चव्हाण (२५), यशवंत निराधार पवार (४२), धर्मा चिमण भोसले (४०) आणि भरत निराधार पवार (३८) सर्व रा. जामदे, ता. साक्री, जि. धुळे यांना अटक केली.
त्यांच्याकडून चार मोबाईल फोन, दोन दुचाकी, लाल मिरची पावडर, पिवळ्या पट्ट्या यांसह एकूण ३.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या आरोपींकडून आणखी काही चोरी किंवा दरोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवारे करीत आहेत.