चोपडा तालुक्यात भर रस्त्यात आदिवासी महिलेची प्रसूती; अंजली दमानिया यांचा संताप.!!!
चोपडा प्रतिनिधी :-
चोपडा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वैजापूर गावाजवळ रस्त्यावरच एका आदिवासी महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. संताबाई बारेला
असे या महिलेचे नाव असून, त्या बोरमळी गावातील
रहिवासी आहेत.तसेच घटनेची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले.हिलेला मंगळवारी अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर नातेवाईकांकडून जवळच्या वैजापूर आरोग्य केंद्रांतर्गत कर्जाणे उपकेंद्राला कळविण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका किंवा आरोग्य विभागाचे कोणी कर्मचारी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे महिलेला तशाच अवस्थेत दुचाकीवरून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला. परंतु, महिला रस्त्यातच प्रसूत झाली. सुदैवाने त्याठिकाणी उपस्थित असलेल्या इतर आदिवासी महिलांनी जोखीम पत्करून लुगड्याच्या आडोशाला प्रसूती पार पाडली. त्यानंतरही बराच वेळ आरोग्य यंत्रणा पोहोचली नाही. त्यामुळे बाळ आणि बाळंतीण बराच वेळ रस्त्यावरच होते.
दरम्यान, बोरमळीच्या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर सर्वत्र टीका होत असताना, अजून किती दिवस प्रगतीशील भारताच्या खोट्या जाहिराती दाखवून महिलांची अशी हेळसांड होणार, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे. जळगाव जिल्ह्यात एक-दोन नव्हेतर, चार मंत्री आहेत. पण आरोग्य यंत्रणा म्हणावी तशी सक्षम नाही. त्यामुळे या घटनेची प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे. आरोग्य सुविधांअभावी लाडक्या बहिणींवर रस्त्यात बाळाला जन्म देण्याची वेळ आली. ही शोकांतिका आहेच, पण ही प्रत्येकासाठी लज्जास्पद घटना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे वाचले आहे. पण जपानमध्ये एखादी महिला बाळाला अशी रस्त्यावर जन्म देत असेल असे वाटत नाही, असा चिमटाही खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना काढला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी, या घटनेस जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून सदर महिलेला भरपाई देण्याची मागणी केली आहे.