घोड्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकाला अटक; समाजमन हादरले.!!!
नागपूर :-
महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका घोडेस्वारी अकादमीमध्ये घोड्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ मे २०२५ च्या रात्री घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकरणी छोटा सुंदर खोब्रागडे (वय ३०) नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, मानसिक विकृतीचा कळस गाठल्याची भावना व्यक्त होत आहे.
नागपूर जिल्ह्यातील खाणी परिसरात असलेल्या घोडेस्वारी अकादमीमध्ये हा लज्जास्पद प्रकार घडला. अकादमीच्या सुरक्षा रक्षकाने आवारात एका संशयास्पद व्यक्तीला पाहिले. त्याने लगेचच अकादमी संचालकांना याची माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी घोड्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन, पोलिसांनी आरोपी छोटा सुंदर खोब्रागडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याला केवळ कायदा आणि सुव्यवस्थेसाठीच नव्हे, तर समाजाच्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना म्हटले आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी प्राणी हक्क कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.