मतदार यादी अद्यावत करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – आयुष प्रसाद.!!!
जळगांव
जिल्ह्यात मतदार यादी अद्यावतीकरण प्रक्रिया सुरु असून या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर १०० टक्के बीएलए (BLA) यांची नियुक्ती करणे आवश्यक असून,या १ जुलै अर्हता दिनांकावर आधारित १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच नावात दुरुस्ती,वगळणी अथवा स्थानांतरण यासाठी विहीत अर्ज सादर करण्याबाबत नागरिकांना जागरूक करावे,असे आवाहन करून मतदार नोंदणी व यादीतील सुधारणा यासंदर्भात विविध सूचना दिल्या.
मतदारांना आपली नावे मतदार यादीत आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी ‘Voter Search App’ चा प्रभावी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच बोगस,दुबार किंवा चुकीची नावे असल्यास तात्काळ ऑनलाईन तक्रार करावी असेही ते म्हणाले.
मतदार यादीतील नावांची शुद्धता राखण्यासाठी समाज माध्यमांद्वारे जनजागृती करावी आणि कोणताही मतदार दुबार नोंदवला जाणार नाही याची दक्षता घ्यावी,असे सांगताना जिल्हाधिकाऱ्यांनी मयत, स्थलांतरित तसेच शिक्षण, रोजगार वा विवाहामुळे कायमस्वरूपी इतरत्र गेलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.