पहूर ते पाचोरा महामार्गाचे काम धोकादायक पद्धतीने सुरू –अपघातांचे प्रमाण वाढले नागरिकांत संताप.!!!
जामनेर तालुक्यातील पहूर ते पाचोरा या महामार्ग क्रमांक १९ चे रुंदीकरणाचे काम मागील एका महिन्यापासून सुरू आहे. मात्र, या कामात ठेकेदाराने सर्व नियमांना पायदळी तुडवत काम सुरू केल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
मागील एका महिन्यात या रस्त्यावर सुमारे वीस अपघात झाले असून, दुचाकीस्वार व मोठ्या वाहनांचे गंभीर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे दिनांक १५ मे, गुरुवार रोजी सकाळी पाचोरा येथून भुसावळकडे जाणारी एसटी बस रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा गंभीर प्रसंग ओढवला असता.
या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून समोर येत असून, संबंधित विभागांकडून या गैरप्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही सुज्ञ नागरिकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांकडून या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच काम नियमांनुसार व सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.