घरकुलाच्या लाभासाठी आधारकार्ड अपडेट असणे आवश्यक.!!!
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन अंतर्गत कच्चे घर व बेघर असणाऱ्या कुटुंबांचे नवीन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश गरजू व पात्र कुटुंबांना योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देणे हा आहे.
सदर सर्वेक्षण सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण नसून फक्त बेघर, कच्च्या घरात राहणारे कुटुंब, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादी मध्ये समाविष्ट न झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले कुटुंब, सर्वेक्षणामध्ये अपात्रेच्या निकषानुसार सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले कुटुंब, नवीन अपात्रेच्या निकषानुसार पात्र असलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण आहे.
योजनेच्या सुधारीत अपात्रतेच्या निकषानुसार तीन, चारचाकी वाहन असणारे कुटूंब, तीन, चारचाकी कृषी उपकरण असणारे कुटूंब, 50 हजार किसान क्रेडीट कार्ड किंवा त्याहुन अधिक क्रेडीट मर्यादा असलेले कुटूंब, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असलेले कुटूंब, शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेली कुटुंबे, कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा 15 हजारापेक्षा जास्त कमवत असलेले कुटूंबे, आयकर भरणारे कुटुंबे, व्यवसायीक कर भरणारे कुटुंब, 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटूंब, 5 एकर पेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे कुटूंब अपात्र आहेत.
ज्या कुटुंबांकडे सद्या राहण्यासाठी पक्के घर नाही किंवा जे पूर्णपणे बेघर आहेत, अशा पात्र कुटुंबांनी आपले सर्वेक्षण करून घ्यावे. सद्या काही कुटुंबे नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणास्तव परगावी वास्तव्यास असतील, त्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गावात येऊन सर्वेक्षण पूर्ण करावे. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सर्वेक्षणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून एकही पात्र कुटुंब योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अतिरिक्त मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरज गोहाड यांनी केले आहे.
सर्वेक्षण पुर्ण करण्याची अंतिम तारीख 15 मे असून हे सर्वेक्षण वेळेत व अचूकपणे होणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आपल्यासोबत ठेवावी. ज्या पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी स्वत:चे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. कुटुंबामध्ये घरकुलाचा लाभ घेतला असल्यास नवीन जॉब पंचायत समितीमध्ये काढून घ्यावे, असे कळविण्यात आले आहे.