जनता नाही, पुढारीच जातीयवादी; स्वार्थासाठी करतात जात उभी” – नितीन गडकरींचा खणखणीत टोला.!!!
अमरावती :-
सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही, तर पुढारीच जातीयवादी आहेत. हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जाती उभ्या करतात,’ असा परखड टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज, २२ मार्च रोजी अमरावतीत लगावला.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी जातीय व्यवस्था आणि राजकारणावर स्पष्ट भाष्य केले. नागपुरातील अलीकडील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
“माझं राजकारण माझ्या हिशोबाने, तुमच्या नाही!”
गडकरी पुढे म्हणाले, “माझ्या मुलाला फक्त माझा मुलगा म्हणून राजकारणात स्थान मिळेल हे मला मान्य नाही. त्याने स्वतःच्या कर्तृत्वावर ते मिळवावं. आमदाराच्या पोटातून आमदार आणि खासदाराच्या पोटातून खासदार जन्माला यायला नको. जनता आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्यासच त्यांना अधिकार आहे. मी लोकसभेत निवडून आलो तेव्हा मी स्पष्ट सांगितलं – माझं राजकारण माझ्या हिशोबाने चालेल, तुमच्या हिशोबाने नाही. मत द्या वा नका द्या, जो मत देईल त्याचंही काम करेन आणि जो नाही देईल त्याचंही!” या ठाम विधानातून त्यांनी आपली राजकीय भूमिका अधोरेखित केली.
गडकरींना प्रतिष्ठेचा पुरस्कार, शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा –
अमरावतीत झालेल्या या सोहळ्यात नितीन गडकरी यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२४’ ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारात ५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी पुरस्काराची रक्कम परत करत मोठी घोषणा केली. “मला मिळालेले ५ लाख आणि माझ्याकडून २० लाख रुपये टाकून मी २५ लाख रुपये देत आहे. हे पैसे विदर्भातील पाच शेतकऱ्यांना पुरस्कार म्हणून द्या,” असे त्यांनी जाहीर केले.
शेतकरी महिलांचाही सन्मान –
या सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दाननिधीतून ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार २०२४’ अकोला येथील वंदना धोत्रे यांना, तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे ‘श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्कार २०२४’ भंडारा जिल्ह्यातील वंदना वैद्य यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार प्रवीण पोटे आणि संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“राजकारण म्हणजे समाजकारण आणि विकासकारण”
गडकरींनी आपल्या भाषणात राजकारणाचा खरा अर्थ मांडला. “आज राजकारणाचा अर्थ समाजकारण आणि विकासकारण आहे. कुणाचा मुलगा किंवा मुलगी असणं हा गुन्हा नाही, पण कर्तृत्वावर स्थान मिळालं पाहिजे,” असं ते म्हणाले.