महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष व्याख्यान
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक महिला दिनानिमित्त जीेएसबीएस हेल्थ रक्षक क्लिनिकतर्फे महिलांच्या मानसिक आरोग्यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वैशाली शेलार यांनी स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचे संतुलन या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
महिला अनेकदा घरगुती जबाबदाऱ्या, कार्यालयीन दायित्वे आणि वैयक्तिक नातेसंबंध यामध्ये समतोल साधताना तणावाचा सामना करतात. तसेच, हार्मोनल बदल आणि सामाजिक अपेक्षांमुळे त्यांचा मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
डॉ. शेलार यांनी महिलांच्या मानसिक स्वास्थ्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकत तणाव व्यवस्थापन आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी उपयुक्त उपाय सुचवले. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढते आणि त्यांना आवश्यक मानसिक आधार मिळतो. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानातून महिलांना मानसिक सशक्तीकरणाची नवी ऊर्जा मिळाली आहे.