महिलांनी दुसऱ्यावर अवलंबून राहायचं कारणच काय.? – पत्रकार सोनल खानोलकर यांचा सडेतोड सवाल.!!!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “आज महिलांचे सबलीकरण झाले आहे असे म्हटले जात असले तरी ती दुसरा जीव निर्माण करण्याची ताकद बाळगते, हीच तिची खरी शक्ती आहे. मग तिने दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचे कारणच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ पत्रकार सोनल खानोलकर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात उपस्थित महिलांसमोर मांडला.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. मनोहर फाळके सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
या कार्यक्रमात गिरणी कामगार महिला आणि घरेलू महिलांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून “मनातली जाणीव” आणि “खतरनाक” मासिकाच्या संपादिका सोनल खानोलकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाच्या ग्रंथपाल ममता घाडी यांनी प्रास्ताविक केले.
आपल्या भाषणात सोनल खानोलकर म्हणाल्या, “केवळ परिस्थितीला दोष देऊन काही साध्य होत नाही. स्वतःला घडविण्याचा प्रयत्न करा. कितीही कठीण प्रसंग आले तरी सकारात्मक राहा. त्यातूनच आत्मबळ निर्माण होते.” त्यांनी पत्रकारितेतील स्वतःच्या अनुभवांचे कथन करत महिलांना धाडसी होण्याचा आणि प्रसंगावधान राखण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमात अनेक महिलांनी भाषणाद्वारे महिलांवरील अत्याचार, सामाजिक समस्या आणि न्यायासाठीच्या संघर्षावर भाष्य केले.
शिवसेना शाखा प्रमुख दिक्षा गुंजाळ म्हणाल्या, “कर्तृत्वाशिवाय आजच्या स्त्रीला आपली ओळख निर्माण करता येत नाही.”
आशा आसबे यांनी “स्त्री नातेबंध सांभाळतानाच इतरांना सावरण्याचे अवघड कार्य करते.” असा मुद्दा मांडला.
श्रावणी पवार यांनी आपल्या कवितांमधून आधुनिक स्त्रीचे वास्तव मांडले.
ममता घाडी यांनी आपल्या प्रास्ताविकात स्त्रियांना निर्भय राहण्याचे आवाहन केले.
उषा सोहनी आणि प्रतिभा ठाकूर यांनीही महिलांच्या सशक्तीकरणावर आपले विचार मांडले.
या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजच्या प्राचार्या वैशाली घेगडमल यांनी उपस्थितांचे आभार मानले. संघटनेचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात विशेष योगदान दिले.
या विचारमंथनातून महिलांना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होऊन, स्वावलंबनाचा नवा आत्मविश्वास मिळाला, हेच या कार्यक्रमाचे यश आहे!