अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ‘लाडकी बहीण योजने’बाबत मोठी अपडेट.?

0 485

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ‘लाडकी बहीण योजने’बाबत मोठी अपडेट.?

मुंबई :-

राज्यातील लोककल्याणकारी योजनांचा अर्थव्यवस्थेवर ताण असला तरी कोणतीही योजना बंद केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी स्पष्ट केले आहे.

माझी लाडकी बहीण” योजना असो किंवा इतर कोणतीही कल्याणकारी योजना, राज्य सरकार त्यात कोणताही बदल करणार नाही. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या  मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कोणत्याही योजना थांबविल्या नाहीत किंवा त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

विरोधी पक्षावर टीका

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “सध्या विरोधकांची अवस्था ‘हम आपके है कौन?’ चित्रपटासारखी झाली आहे. त्यांनी सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहून काम करावे. आमच्याकडे प्रचंड बहुमत असले तरी विरोधी पक्षाचा सन्मान राखत काम करू,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

लाडकी बहीण” योजना बंद होणार नाही

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील आर्थिक शिस्त योग्य प्रकारे पाळली जात आहे. त्यामुळे ‘माझी लाडकी बहीण’ यासह कोणतीही कल्याणकारी योजना बंद केली जाणार नाही.” कॅगच्या (CAG) सूचनांनुसार पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना योजनेंतर्गत लाभ देता येणार नाही, इतकाच नियम सरकार पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

शिंदे आणि माझ्यात कोणतेही कोल्डवॉर नाही

“एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या कोणत्याही योजना मी थांबवल्या नाहीत. त्यांच्या कामांची चौकशी सुरू झाल्याच्या अफवा निराधार आहेत. आमच्यात कोणतेही कोल्डवॉर नाही, उलट वॉरच कोल्ड आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या कोणत्याही पत्रावर चौकशी संदर्भात “तपास करा किंवा माहिती घ्या” असा शेरा असतो. याचा अर्थ तिथे चौकशी सुरू झाली असे होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमित शाह-शिंदे भेटीवर खुलासा

संजय राऊत  यांनी केलेल्या पहाटे चार वाजताच्या भेटीच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. “त्या भेटीवेळी मीही उपस्थित होतो. सकाळी दहा वाजता शिंदे साहेब अमित शाह यांना भेटले, तो केवळ सौजन्याचा भाग होता. कोणतीही खास चर्चा झाली नाही,” असे फडणवीस म्हणाले.

 

अजितदादांची खुर्ची फिक्स

पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हलक्या फुलक्या शब्दांत, “महायुती सरकार आल्यापासून आमच्या खुर्च्या बदलल्या, पण अजितदादांची खुर्ची मात्र फिक्स आहे,” असा विनोदी टोला हाणला. शिंदे यांनी पुढे स्पष्ट केले, “आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो नसून, जनतेची कामे करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सध्या उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे कोल्डवॉर कसे असेल?”

 

राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असले तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारमध्ये कुठलाही अंतर्गत संघर्ष नसल्याचे स्पष्ट केले. “लाडकी बहीण योजना” यासह कोणतीही लोककल्याणकारी योजना बंद होणार नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितले. विरोधकांनी सशक्त भूमिका घ्यावी, असा सल्ला देत त्यांनी सध्याच्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!