“माझा प्रभाग, माझी जबाबदारी” अभियानाला आजपासून प्रारंभ; नागरिकांच्या दारी जाऊन जाणून घेणार समस्या
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने नगरपरिषद भडगावतर्फे “माझा प्रभाग, माझी जबाबदारी – स्वच्छ व सुंदर प्रभाग” या महत्त्वाकांक्षी अभियानाची आजपासून सुरुवात होत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
या अभियानात सन्माननीय नगराध्यक्षा, सन्माननीय उपनगराध्यक्ष, सन्माननीय गटनेते तसेच संबंधित प्रभागातील दोन्ही नगरसेवक सहभागी होणार असून, प्रत्येक प्रभागात नागरिकांशी थेट संवाद साधून स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, पथदिवे, सार्वजनिक आरोग्य तसेच इतर नागरी सुविधांबाबतच्या समस्या नोंदविण्यात येणार आहेत.
अभियानाचा पहिला टप्पा आज सकाळी ८.०० वाजता प्रभाग क्रमांक ३ येथून सुरू होत असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व १२ प्रभागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. पाहणीदरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारींचे वर्गीकरण करून संबंधित विभागांकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या अभियानाबाबत नगरसेवक तथा आरोग्य व स्वच्छता सभापती सय्यद इमरान अली शहादत अली यांनी सांगितले की, “स्वच्छ व सुंदर भडगाव घडविण्यासाठी केवळ नगरपरिषदेचे प्रयत्न पुरेसे नाहीत, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून नागरिकांच्या सहभागाने प्रभागातील समस्या समजून घेऊन त्यांचे प्रभावी व कायमस्वरूपी निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.”
या अभियानामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनापर्यंत मांडण्याची संधी मिळणार असून, शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम व दर्जेदार करण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या प्रभागाला स्वच्छ, सुंदर आणि आदर्श प्रभाग बनविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.





