पाचोरा-भडगाव विधानसभाक्षेत्र प्रमुखपदी हर्षल संजय पाटील; राष्ट्रवादी काँग्रेसने युवा नेतृत्वावर टाकला विश्वास
संघटन विस्ताराची महत्त्वाची जबाबदारी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
भडगाव प्रतिनिधी :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत भडगाव तालुक्यातील कनाशी येथील युवा नेतृत्व हर्षल संजय पाटील यांची पाचोरा-भडगाव विधानसभाक्षेत्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षातील सातत्यपूर्ण कार्य, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेला मजबूत संपर्क याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
ही नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा ताई पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांच्या मान्यतेने करण्यात आली असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.
हर्षल पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भडगाव तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना गावपातळीवर पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी, युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी आणि विविध जनसंपर्क अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, याच कामाची पोचपावती म्हणून त्यांच्यावर विधानसभाक्षेत्र प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीप्रसंगी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, महिला कार्याध्यक्षा लता राठोड, उत्तर महाराष्ट्र युवती प्रमुख अभिलाषा रोकडे, युवती जिल्हाध्यक्षा मोनिका पवार, चाळीसगाव तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, शहराध्यक्ष कुशल देशमुख, विद्यार्थी कार्याध्यक्ष अजहर शेख, सागर घुगे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्तीनंतर हर्षल पाटील यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, “पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटना अधिक सक्षम करणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाशी जोडणे हेच माझे ध्येय राहील,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राजकीय वर्तुळात या नियुक्तीकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात असून, पाचोरा-भडगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यात हर्षल पाटील यांची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.





