तक्रारीची तात्काळ दखल; अवघ्या एका तासात दुर्गंधीचा बंदोबस्त,पाचोरा नगरपालिकेच्या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा शहरातील शासकीय आयटीआय परिसरात मागील पंधरा दिवसांपासून कुजलेला कचरा व खराब फळांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आयटीआयचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी त्रस्त झाले होते. याबाबत तक्रार मिळताच पाचोरा नगरपालिकेने अवघ्या एका तासात परिसराची संपूर्ण स्वच्छता करून नागरिकांना दिलासा दिला.
पत्रकार राजेंद्र खैरनार यांनी या समस्येची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे व आरोग्य अधिकारी तुषार नकवाल यांना दूरध्वनी व व्हॉट्सअॅपद्वारे दिली. तक्रारीची गंभीर दखल घेत नगरपालिकेने ट्रॅक्टर, जेसीबी, सफाई कर्मचारी आणि ब्लिचिंग पावडरसह घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
या कारवाईमुळे शासकीय आयटीआय परिसर, वसाहतीच्या आजूबाजूचा भाग तसेच मूकबधिर पांडे विद्यालय परिसरातील दुर्गंधी दूर झाली. नगरपालिकेच्या तत्पर कार्यवाहीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, सफाई विभाग व सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
या स्वच्छता मोहिमेसाठी नगराध्यक्षा सौ. सुनिता पाटील, उपनगराध्यक्ष किशोर आप्पा बारवकर तसेच अशोक आप्पा पाटील यांचेही सहकार्य लाभले.
यावेळी पत्रकार राजेंद्र खैरनार यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. नगरपालिकेच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या कार्यतत्परतेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.





