आपला जिल्हामहाराष्ट्रविशेष

गुजरातकडे जाणारे पाणी आता आपल्या शेतात नार–पार–गिरणा नदी जोड प्रकल्पाला मुहूर्त; नाशिक–जळगावचा कायापालट.!!!

नाशिक प्रतिनिधी :-

उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी व अतितुटीच्या भागांसाठी वरदान ठरणाऱ्या बहुप्रतिक्षित नार–पार–गिरणा नदी जोड प्रकल्पाला अखेर मुहूर्त लाभला आहे. जलसंपदा विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ४,११६ कोटी रुपयांची निविदा काढली असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या योजनेला अखेर प्रत्यक्ष कामाची दिशा मिळाली आहे. या निर्णयामुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यांतील शेती, पिण्याचे पाणी आणि एकूणच जलव्यवस्थापनात आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नार, पार, औरंगा व अंबिका या चारही पश्चिमवाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावतात. या नद्या पुढे गुजरातमार्गे वाहत अरबी समुद्रात मिळतात. पावसाळ्यात या नद्यांमधील मोठ्या प्रमाणावरील पाणी विनावापर समुद्रात वाहून जाते. हेच अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील गिरणा उपखोऱ्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नार–पार–गिरणा नदी जोड योजना प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय, आर्थिक व राजकीय कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे कागदावरच राहिला होता.

या प्रकल्पाअंतर्गत नार व पार नद्यांमधील एकूण १०.७६ टीएमसी (३०४.६० दशलक्ष घनमीटर) पाणी उचलून ते पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत वळवण्यात येणार आहे. यापैकी साडेनऊ टीएमसी पाणी नाशिक व जळगाव जिल्ह्यांच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येईल, तर उर्वरित पाणी धरण परिसरातील स्थानिक गरजांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत ७,४६५ कोटी रुपये इतकी आहे. यातील पहिल्या टप्प्यातील ४,११६ कोटी रुपयांच्या निविदेमध्ये भूसंपादन, पुनर्वसन, प्रकल्पाची रचना (डिझाइन) तसेच बांधकामाचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात निश्चित केलेल्या ठिकाणी नऊ धरणांचे बांधकाम करण्यात येणार असून, या धरणांमधून पाणी उचलून ते बोगदे, कालवे आणि पाईपलाइनद्वारे गिरणा नदीत सोडले जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात कालवे, पाइप वितरण जाळे तसेच गिरणा उपखोऱ्यातील चणकापूर धरणात पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या पूरक कामांची निविदा काढली जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.

या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे एकूण ४९,५१६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २५,३१८ हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर आणि धरण परिसरातील ७,१७४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

नार–पार–गिरणा नदी जोड प्रकल्पामुळे केवळ शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, भूजल पातळी, ग्रामीण रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांनाही मोठी चालना मिळणार आहे. वर्षानुवर्षे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी आता उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांसाठी जीवनदायी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!