
भडगाव नगर परिषद चा हलगर्जीपणा उघड; प्रभाग क्र. ३ मध्ये जीवाशी खेळणारे पाईपलाईन काम.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुरू असलेले पाणी पाईपलाईनचे काम सध्या नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ करत असल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्याच्या मधोमध उघडे नळ, बाहेर काढून ठेवलेले पाईप, खोल खड्डे आणि असमतल रस्ता यामुळे परिसरात अक्षरशः अपघाताचे सापळे तयार झाले आहेत.
रात्रीच्या वेळी कोणतीही ठोस प्रकाशव्यवस्था किंवा इशारा फलक नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत असून किरकोळ अपघातांच्या घटना घडल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या कामाचा ठेका लक्ष्मी कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला देण्यात आला आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराचा मॅनेजर एकदाही प्रत्यक्ष स्थळी फिरकला नसल्याचा आरोप होत आहे. इतकेच नव्हे तर नगरपरिषदेचा कोणताही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी देखरेखीसाठी उपस्थित नसल्याने काम मनमानी व निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पाईप टाकण्यासाठी केवळ सुमारे सहा इंच खोदाई करण्यात येत आहे. नियमांनुसार आवश्यक खोलीपर्यंत खोदाई न करता काम उरकण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भविष्यात पाईप फुटणे, रस्ता खचणे किंवा गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात ॲडव्होकेट सलमान मिर्झा यांनी लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
संबंधित कंत्राटदार व मॅनेजर यांना तात्काळ स्थळी उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत.
नियमानुसार आवश्यक खोलीपर्यंत खोदाई करूनच पाईपलाईन टाकावी.
रस्त्यावरील उघडे नळ, पाईप व साहित्य तातडीने सुरक्षितरीत्या बसवावे.
संपूर्ण कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास एखादा मोठा अपघात घडल्यावरच जाग येणार का, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. आता तरी संबंधित विभागाने जबाबदारीची जाणीव ठेवून त्वरित कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.



