भडगाव | प्रतिनिधी
भडगाव येथून रासायनिक खतांची बेकायदेशीर वाहतूक करून ती काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचा प्रकार कृषी विभागाच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. या कारवाईत इफको कंपनीचा २५ टन युरिया जप्त करण्यात आला असून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा स्तरीय भरारी पथकाला भडगाव येथून खतांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भडगाव येथून संशयित ट्रकचा पाठलाग करण्यात आला. सदर ट्रक चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावाजवळील साईनाथ भारत पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी अडविण्यात आला.
तपासणीदरम्यान ट्रकमध्ये इफको कंपनीचा युरिया खताच्या ४५ किलो वजनाच्या ५५० बॅगा आढळून आल्या. सदर खताची एकूण किंमत सुमारे १ लाख ४६ हजार ३०० रुपये असल्याचे निष्पन्न झाले. ट्रक चालकाकडे सदर मालाबाबत कोणतेही बिल, डिलिव्हरी चलन अथवा परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.
चौकशीत ट्रक चालकाने आपले नाव नाजीम रहीम शिसगर (वय ४३, रा. हनुमान नगर, ता. चांदवड, जि. नाशिक) असल्याचे सांगून सदर खत भडगाव येथील स्वामी ऍग्रो या कृषी सेवा केंद्रातून भरल्याचे कबूल केले.
या प्रकरणी ट्रक चालकासह स्वामी ऍग्रो सेवा केंद्राचा मालक व एका अज्ञात इसमाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल भडगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा करीत आहेत.
