अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनीची आदर्श प्रामाणिकता— जबाबदारीची भावना ठसवणारी प्रेरणादायी घटना.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये घडलेली एक छोटी पण अत्यंत प्रेरणादायी घटना सध्या शाळेत तसेच परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. शाळेच्या आवारात एका विद्यार्थिनीला मोबाईल फोन सापडताच तिने कोणतीही दिरंगाई न करता तो आपल्या वर्गशिक्षकांकडे सुपूर्द केला. विद्यार्थिनीने दाखवलेली ही प्रामाणिकता आणि जबाबदारीची वृत्ती खरोखरच कौतुकास्पद ठरली आहे.
सदर विद्यार्थिनीला मोबाईल फोन सापडल्याची माहिती मिळताच शिक्षकांनी त्वरित तो शाळा प्रशासनाकडे जमा केला. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईलच्या वास्तविक मालकाचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळा प्रशासन या बाबतीत अत्यंत पारदर्शकपणे आणि जबाबदारीने कार्यवाही करत आहे.
या प्रसंगी अबुझर शेख (इ.9वी) आणि अरबाझ जाकीर मणियार (इ.9वी) हे विद्यार्थीही उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थिनीच्या प्रामाणिकतेचे कौतुक केले.
घटनेबाबत प्रतिक्रिया देताना शाळेचे मुख्याध्यापक शोएब सर म्हणाले,
“विद्यार्थ्यांनी दाखवलेली प्रामाणिकता ही शाळेची खरी ओळख असते. अशा आदर्श कृतीमुळे तरुण पिढीमध्ये नैतिक मूल्यांचा विकास होतो आणि इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण उभे राहते.”
या वेळी आकिब सर, रेहान सर, अझहर सर, तसेच इलियास मलिक उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थिनीच्या उत्तम संस्कारांचे आणि जबाबदार वर्तनाचे कौतुक करत तिला अभिनंदन दिले.
अँग्लो उर्दू हायस्कूलमधील ही घटना विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकतेची, सद्वर्तनाची आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ करण्यास अत्यंत उपयुक्त ठरणारी असल्याचे मत शिक्षकमंडळाने व्यक्त केले.
