पाचोरा भडगाव मतदार संघांचे आ. किशोर आप्पा पाटील यांसह अनेकांना तालिका सभापतीपदाची संधी
नागपूर (वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या तालिका सभापतींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका सभापतींची यादी सभागृहात जाहीर केली.
विधानसभेच्या तालिका सभापतीपदी नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये पाचोरा भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सह अनेक समावेश असून त्यांच्यासह मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती,श्रीमती सरोज अहिरे, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव जानकर, रामदास मसराम आणि समीर कुणावार यांचीही तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.
तालिका सभापती हे अधिवेशनादरम्यान अध्यक्षीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. विधेयकांवरील चर्चा, प्रश्नोत्तरांच्या तासासह विविध विषयांच्या मांडणीदरम्यान सभागृहाचे शिस्तबद्ध संचालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
दरम्यान, विधान परिषदेच्या कामकाजासाठीही तालिका सभापतींची नियुक्ती करण्यात आली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अमित गोरखे, कृपाल तुमाने,अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे आणि सुनील शिंदे या सदस्यांची तालिका सभापती म्हणून नावांची घोषणा केली.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका सभापतींच्या नियुक्त्या जाहीर झाल्याने पुढील दोन आठवड्यांत अधिवेशनाचे कामकाज अधिक गतीने आणि शिस्तबद्धपणे पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
