अवैध धंद्यांवर वचक ठेवणाऱ्या पोलिसांच्या धाडसी कारवाईचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडून कौतुक.!!!
पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पारोळा पोलिसांचा सन्मान
अवैध धंद्यांवर वचक ठेवणाऱ्या पोलिसांच्या धाडसी कारवाईचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडून कौतुक.!!!
पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पारोळा पोलिसांचा सन्मान
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा तालुक्यातील अवैध धंद्यांवर वचक ठेवत सतत प्रभावी कारवाया करणाऱ्या पारोळा पोलिसांच्या धाडसी कामगिरीचा गौरव म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि कविता नेतकर यांच्या हस्ते पोलिसांचा सन्मान करण्यात आला. अवैध देशी दारू अड्डे, अफूची शेती व इतर गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पारोळा पोलिसांनी केलेली सततची कारवाई जिल्ह्यात कौतुकास पात्र ठरली आहे.
अलीकडेच पारोळा पोलिसांनी बोरी नदीकाठी सुरू असलेल्या अवैध देशी दारू अड्ड्यावर गुप्त माहितीनुसार छापा टाकला. या कारवाईत उपविभागीय अधिकारी (पोलीस) विनायक कोते, पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक अमोल दुकळे, सुनील हटकर, डॉ. शरद पाटील, महेश पाटील, प्रविण पाटील आणि अनिल राठोड यांनी सहभाग घेतला. कारवाईदरम्यान ₹38 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना अटक करून त्यांच्यावर पुढील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यानंतर, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शरद पाटील, मिथुन पाटील, आकाश पाटील, आणि संजय पाटील यांच्या पथकाने म्हसवे शिवारातील राजस्थान ढाब्याजवळील परिसरात अफूची बोंडे असलेली शेती आढळून आली. पथकाने तातडीने कारवाई करून ₹50 लाख 82 हजार 992 रुपये किमतीची अफू व इतर साहित्य हस्तगत केले. आरोपींना अटक करण्यात येऊन पुढील तपास सुरू आहे.
या दोन्ही मोठ्या कारवायांमुळे तालुक्यातील अवैध धंद्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात मोठे यश मिळाले आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पारोळा पोलिसांचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते पारोळा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पारोळा परिसरातील नागरिक, समाजसेवक आणि राजकीय नेत्यांनीही पारोळा पोलिसांचे अभिनंदन केले. स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारच्या कारवायांमुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच भविष्यातही पारोळा पोलीस अशाच धाडसी कारवाया करत राहतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.