कजगाव येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई,मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिक हैराण.!!!
भडगाव ता. प्रतिनिधी :- आमीन पिंजारी
भडगाव तालुक्यातील कजगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गावातील नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणावर हाल सोसावे लागत असून, अनेक ठिकाणी दूषित पाणी नळाला येत असल्याने लहान मुले व वृद्ध आजारांना बळी पडत आहेत.
गावात दोन-तीन वर्षांपूर्वी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. मात्र, अद्यापही गावकऱ्यांना नियमित व शुद्ध पाणी मिळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महिलांना व वृद्धांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची तसेच भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.