युगंधरा पाटीलचा यशस्वी प्रवास – MPSC मध्ये राज्यात अव्वल.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
“मेहनत, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यशाची शिखरे गाठण्यास नेहमीच हातभार लावते,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाचोरा शहरातील जयकिसान कॉलनी येथील रहिवासी कु. युगंधरा राजेंद्रसिंग पाटील. शैक्षणिक क्षेत्रापासून ते स्पर्धा परीक्षांच्या कठीण वाटेवर केलेल्या तिच्या भरीव कामगिरीमुळे पाचोरा शहरासह संपूर्ण परिसराचा मान उंचावला आहे.
शैक्षणिक प्रावीण्य
युगंधराने दहावी व बारावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवत आपला शैक्षणिक पाया मजबूत केला. त्यानंतर बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून इंग्रजी विषयात तिने पदवी प्राप्त करताना सुवर्णपदक पटकावले. याचबरोबर पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळवून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. पुढे तिची नेमणूक विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर होणे, हीदेखील तिच्या बुद्धिमत्तेची व परिश्रमांची दखल मानली जाते.
स्पर्धा परीक्षांतील कामगिरी
युगंधराने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर स्पर्धा परीक्षांतही उत्तुंग कामगिरी केली आहे. सप्लाय इन्स्पेक्टर, व्हिलेज रेव्हेन्यू ऑफिसर तसेच महिला व बालविकास विभागातील पर्यवेक्षिका अशा विविध पदांवर तिची निवड झाली असून ती सध्या चाळीसगाव येथे कार्यरत आहे.
MPSC मधील ऐतिहासिक यश
अलीकडेच जाहीर झालेल्या MPSC निकालात युगंधराने ऐतिहासिक कामगिरी करून राज्यभरात आपले नावलौकिक निर्माण केला.
STI (EWS Female वर्ग 2) पदासाठी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
ASO पदासाठी महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक
याशिवाय, वर्ग 1 पदासाठीची तिची मुलाखत नुकतीच पूर्ण झाली असून तिच्या आत्मविश्वास व अभ्यासू वृत्तीवर परीक्षकांनी सकारात्मक छाप घेतल्याचे समजते.
भव्य सत्कार समारंभ
या यशाच्या पार्श्वभूमीवर नवदुर्गा महिला मंडळ दुर्गोत्सव मंडळ, जयकिसान कॉलनी, पाचोरा यांच्या वतीने युगंधरा पाटीलचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी श्रीमती कमलाताई रघुनाथ पाटील, महिला मंडळातील सभासद तसेच प्रभागातील जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात युगंधराचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रेरणादायी आदर्श
युगंधरा पाटीलचा हा प्रवास केवळ तिच्या वैयक्तिक परिश्रमाचा परिपाक नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. तिची मेहनत, चिकाटी व ज्ञानसंपन्नता भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास समाजातील मान्यवरांनी व्यक्त केला.
ही आहे एका सर्वसामान्य घरातील मुलीची असामान्य कहाणी – जी आज पाचोरा, जळगाव जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा अभिमान बनली आहे.