संत नरहरी महाराज जयंतीनिमित्त डॉ. विश्वासराव आरोटे यांना ‘संत वारकरी भूषण’ पुरस्कार प्रदान.!!!

0 53

संत नरहरी महाराज जयंतीनिमित्त डॉ. विश्वासराव आरोटे यांना ‘संत वारकरी भूषण’ पुरस्कार प्रदान.!!!

 

आळंदीत अखंड हरिनाम सप्ताहाचा भव्य समारोप

दैवज्ञ सुवर्णकार समाजाचा डॉ. विश्वासराव आरोटे यांना संत वारकरी भूषण पुरस्कार

 

आठ दिवस भक्तिरसात न्हालेली आळंदी नगरी – हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण आणि समाजसेवेचा संगम

 

पुणे/आळंदी :-

श्रावण महिन्याच्या पवित्र प्रारंभी आळंदी नगरीत भक्तिरसाचा झरा अखंड वाहत होता. दैवज्ञ सुवर्णकार समाजाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होऊन शुक्रवार दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या भक्तिभावात आणि सांस्कृतिक उत्साहात संपन्न झाला. हा आठ दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक महोत्सव आळंदी येथील देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज धर्मशाळा, श्रीम. चंद्रकला भीमाशंकर खोल्लम सभागृहात पार पडला.

दररोज शेकडो भाविकांनी या सोहळ्यात हजेरी लावून नामस्मरण, पारायण आणि कीर्तनाचा लाभ घेतला. अखेरच्या दिवशी झालेल्या भव्य समारोप कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरी चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांना ‘संत वारकरी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मानपत्र, संत तुकाराम महाराज पगडी, वीणा, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

तसेच दैनिक समर्थ गांवकरी चे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर यांनाही तुकाराम महाराज पगडी, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांनाही पुणेरी पगडी, श्रीफळ आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती प्रदान करण्यात आली.

या सोहळ्यासाठी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संजोक काळदंते, उपाध्यक्ष रविंद्र बेल्हेकर, सचिव तृप्ती टकले, सहसचिव पुष्पा निघोजकर, खजिनदार राहुल निघोजकर, डॉ. विशाल खोल्लम, माजी अध्यक्ष सचिन टकले, विश्वस्त प्रमोद खोल्लम, राजू बेल्हेकर, हेमंतकुमार टकले, विनायक बेदरकर, गणेश बेल्हेकर, सुपर्णा बेल्हेकर, सल्लागार नंदकुमार टकले यांसह आळंदी परिसरातील संतप्रेमी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन्मान स्वीकारताना डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणात संत नगरीत आलेल्या ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले,

> “संपूर्ण हिंदुस्थानात ज्यांचे नाव दातृत्व आणि समाजसेवेत आदराने घेतले जाते अशा नानजीभाई ठक्कर यांना येथे पाहण्याचा योग हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी या सोहळ्याविषयी सांगितले. तेव्हाच येथे येण्याचा निर्धार केला.”

डॉ. आरोटे यांनी नानजीभाई ठक्कर यांच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की, त्यांनी आजवर तब्बल ७० ते ८० हजार मंदिरे उभारली आहेत. मंदिर बांधकाम असो वा रुग्णाच्या उपचाराचा खर्च, कोणताही सामाजिक उपक्रम – ते निःस्वार्थपणे मदत करतात. आळंदीच्या इंद्रायणी काठी त्यांनी २०० फूट उंच, तब्बल ३१ कोटी रुपये खर्चून भव्य मंदिर उभारले आहे.

दरवर्षी पंढरपूरच्या दिंड्यांना १०० क्विंटल बुंदीचा प्रसाद वाटण्याची सेवा ते करतात. वयाच्या ८५ व्या वर्षीही ते पहाटे साडेतीन वाजता उठून सकाळी आठ वाजता कार्यालयात उपस्थित असतात. त्यांच्या कार्यालयात वर्षभर लोकांची वर्दळ असते. दौर्‍यांदरम्यान अनेकदा पोलिस संरक्षण मिळते, परंतु आळंदीला येताना ते म्हणतात, “येथे मला संरक्षणाची गरज नाही.”

धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन मदत करणे हे नानजीभाईंच्या कार्याचे वैशिष्ट्य असल्याचे डॉ. आरोटे यांनी नमूद केले. “जेव्हा कधी ते दातृत्व करत नाहीत, तो दिवस त्यांना अपूर्ण वाटतो,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, स्थानिक भाविक, दिंडी क्र.५४ चे सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली. आठ दिवस चाललेल्या या महोत्सवात पारायण, हरिनाम सप्ताह, कीर्तन, भजन तसेच संतवाङ्मय वाचनामुळे आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामुळे केवळ अध्यात्मिक वातावरणच निर्माण झाले नाही, तर समाजसेवा, दातृत्व आणि संत विचारांचा संदेशही भाविकांपर्यंत पोहोचला. ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांची प्रेरणादायी उपस्थिती आणि डॉ. विश्वासराव आरोटे यांचे प्रभावी भाषण यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!