पारोळ्यात कानबाई माता उत्सव जल्लोषात.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – येथे खान्देशाची ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय वातावरणात जल्लोषात साजरा करण्यात आला.
रविवारी ३ रोजी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली तर सोमवारी ४ रोजी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.यानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण पसरले होते.रविवारी रात्री मनोभावे पूजा अर्चासह भाविक कानबाई मातेची जोगवे,गीत गायन व नाचून आनंद व्यक्त केला.तर सोमवारी सकाळी कानबाई मातेची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी शहरातील अनेक राजकीय, सामाजिक यांचेसह महीला युवती युवक अबाल वृद्धांनी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होत डि जे व पारंपारिक वाद्याचा तालावर ठेका धरला.शिव दरवाजा जवळ पारंपारिक पद्धतीने पुजा अर्चा करून कानबाई मातेला निरोप देण्यात आला. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस निरिक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक राजेंद्र कोठावदे, उपनिरीक्षक अमोल दुकळे, आशिष गायकवाड आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
झिम्मा फुगडीने वेधले लक्ष
कानबाई माता विसर्जन मिरवणुकीत महिला युवतींमध्ये उत्साह संचारला होता,देवीच्या गीतांवर त्यांनी ठिकठिकाणी झिम्मा फुगडीचा आंनद लुटला.
पालिकेकडून खड्ड्यांची मलमपट्टी अपुर्णच
उत्सवाचा पार्श्वभूमीवर शनिवारी पालिकेने देवीच्या प्रमुख मार्गावरील रस्त्यांवर डागडुजी व साफसफाई केली.परंतु डागडुजी करतांना विशेष लक्ष न देता दुर्लक्ष केले त्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्ड्यांची परिस्थीती ‘जैसे थे’ च होती.परिणामी उत्सव मिरवणूकीत भाविकांना अडथळे निर्माण होताना दिसुन आले.दरम्यान
पालिकेकडून मिरवणुकीचा मुख्य मार्गावर ठराविक खड्डेच बुजविल्याने भाविकांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
२२ डि जे सहभागी, आवाजावर करडी नजर
कानुबाई माता उत्सव मिरवणुकीत ह्या वर्षी २२ डि जे वाजविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आज पर्यंतच्या सर्वाधिक मिरवणुकींत हया वर्षी पारोळासह धुळे,भडगांव ईतर ठिकाणांहून डि जे हे सहभागी झाले होते.दरम्यान डि जे च्या आवाजावर बंधन ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे आवाज मापक मशिनव्दारे तपासणी केली जात होती.ज्या डि जे च्या आवाज जास्त दिसुन येत होता अशांचा चालक मालकांना समज देण्यात आली तर नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड ही वसुल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.