दुचाकी चोरी प्रकरण उघडकीस, दोघांना अटक
पारोळा प्रतिनिधी :-
कोळपिंप्री गावातून चोरीला गेलेल्या दुचाकी प्रकरणी पारोळा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई २१ जुलै रोजी रात्री ११ वाजेनंतर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने करण्यात आली. कोळपिंप्री येथील ज्ञानेश्वर मच्छिद्र कोळी यांची हिरो कंपनीची दुचाकी (एमएच-५४ ए-२१९५) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. सदर दुचाकीची किंमत अंदाजे ३५ हजार रुपये होती.
या प्रकरणात पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हवालदार सुनील हटकर, प्रवीण पाटील व अनिल राठोड यांच्या पथकाला तपासासाठी नियुक्त केले. पथकाने आरोपी अभय प्रवीण पाटील (वय १९, रा. कोळपिंप्री) याला अमळनेर येथून अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत दुचाकी मयूर तुळशीदास देवरे (वय २२, रा. खडकी, ता. मालेगाव) याच्याकडे असल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी मालेगाव येथून मयूर देवरे यालाही ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी चोरी गेलेली दुचाकी जप्त केली आहे.
तपास हवालदार सुनील हटकर करत आहेत.