जारगाव येथे “एक पेड मा के नाम” उपक्रम उत्साहात साजरा; आमदार किशोर पाटील यांची उपस्थिती.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
गोराडखेडा उर्दू केंद्र आणि शिक्षक सेना पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उर्दू शाळा, जारगाव (ता. पाचोरा) येथे महाराष्ट्र शासनाचा “एक पेड मा के नाम” हा पर्यावरणपूरक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील (भडगाव-पाचोरा मतदारसंघ) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सुमित किशोर पाटील, पाचोरा मार्केट कमिटीचे सभापती गणेश पाटील, केंद्रप्रमुख कदीर शब्बीर, शिक्षक सेना जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा संघटक विजय ठाकूर, गटशिक्षणाधिकारी विपीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर यांनी केली. पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करताना विजय ठाकूर यांनी वाढती जागतिक उष्णता आणि त्यावर उपाय म्हणून वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर पाटील यांनी ग्लोबल वॉर्मिंगमुळे उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांचा उल्लेख करत, “एक पेड मा के नाम” सारख्या उपक्रमांना समाजाने स्वीकारले पाहिजे असे आवाहन केले. त्यांनी सस्टेनेबल युजचे उदाहरण देत नैसर्गिक संसाधनांचा विवेकपूर्ण वापर करण्याचे आवाहन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जारगाव, कुरंगी, अंतुरली आदी उर्दू शाळांचा गौरव करत आमदार पाटील यांनी शिक्षकांचे विशेष कौतुक केले. यावेळी तालुक्यातील सात गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी आमदार किशोर पाटील यांनी आपल्या स्व. आई नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्या स्मरणार्थ एक वृक्ष लावून प्रत्यक्ष उदाहरण सादर केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आसिफ जलील, शिक्षक व ग्रामपंचायत सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शेख जावेद रहीम यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक आणि नागरिक उपस्थित होते.