पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना ‘ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन’ पुरस्काराने सन्मानित
शिर्डी | २० जुलै २०२५ – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील भ्रष्टाचार आणि मानवी हक्क उल्लंघनाच्या घटनांना वाचा फोडणाऱ्या MTS24 News धडक बेधडक या व्यासपीठावरील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना ‘ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
हा पुरस्कार नुकताच शिर्डी येथे पार पडलेल्या एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते सूर्यवंशी यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्यात बोलताना खंडापूरकर बाबा म्हणाले, “पत्रकारिता ही समाजाच्या आरशासारखी असते. भ्रष्टाचार, अन्याय, आणि अन्य सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकून समाजप्रबोधन करणाऱ्या पत्रकारांचे कार्य समाज परिवर्तनाच्या दिशेने फार मोठे योगदान देते.”
महेंद्र सूर्यवंशी यांचे कार्य हे केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता, जनजागृती व सामाजिक उत्तरदायित्वाचे एक प्रभावी उदाहरण बनले आहे. ‘धडक बेधडक’ या माध्यमातून त्यांनी सातत्याने निर्भीडपणे सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न केला असून, त्यामुळेच त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कार स्विकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना सूर्यवंशी यांनी सांगितले की, “हा सन्मान माझ्या कार्याला मिळालेली मान्यता आहे. हा पुरस्कार मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देतो आणि पुढेही समाजासाठी लढण्याची प्रेरणा देतो.”
या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवसंजीवनी मिळाली असून, भविष्यात ते अधिक जोमाने सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.