गुटख्याची चोरटी वाहतूक उघडकीस; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.!!!
चाळीसगाव प्रतिनिधी :-
गुटख्याची अवैध वाहतूक करत असलेली महिंद्रा कंपनीची बुलेरो मालवाहू गाडी चाळीसगाव शहर पोलीसांनी रविवारी पहाटे जेरबंद केली. नागद गावाकडून चाळीसगावकडे येणाऱ्या या वाहनाबाबत पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पथक रवाना केले.
पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले आणि त्यांच्या पथकाने हिरापूर रोडवरील नवजीवन सुपर शॉपीजवळ संशयित वाहन (क्रमांक MH 41 AY 3210) थांबवून तपासणी केली. तपासणीअंती वाहनात गुटख्याने भरलेल्या गोण्या सापडल्या. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. वाहनातून ७,१९,०२९ रुपये किंमतीचा गुटखा तसेच ८ लाख रुपये किंमतीची गाडी, एकूण १५,२९,०२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गाडी चालक आणि त्याचा साथीदार अरबाज इब्राहीम पठाण (रा. सार्वे, ता. पाचोरा) आणि गुटखा मालाचा मालक दीपक वेदमुथा (रा. नागद, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पगार यांनी फिर्याद दिली असून कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार), उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, तसेच पोलीस अंमलदार राहुल सोनवणे, योगेश बेलदार, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, समाधान पाटील आणि गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी ही कामगिरी केली.