व्हॉइस ऑफ लाईफ’ व्याख्यानमालेचा प्रभावी प्रारंभ : अंमली पदार्थविरोधी जागरूकतेसाठी महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम.!!!
व्हॉइस ऑफ लाईफ’ व्याख्यानमालेचा प्रभावी प्रारंभ : अंमली पदार्थविरोधी जागरूकतेसाठी महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम.!!!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २६ जून २०२५ रोजी साजऱ्या झालेल्या अंमली पदार्थांचे गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त, श्रीमती एम. एम. पी. शाह महिला कला आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) आणि इंडियन असोसिएशन ऑफ लाईफ स्किल्स एज्युकेशन (IALSE), चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने “व्हॉइस ऑफ लाईफ” या व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
आभासी माध्यमातून पार पडलेल्या या सत्रामध्ये, अंमली पदार्थांच्या गैरवापराबाबत जनजागृती वाढवणे, प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन देणे आणि जीवन कौशल्यांच्या माध्यमातून या जागतिक समस्येच्या निराकरणासाठी सकारात्मक भूमिका घेणे, हा केंद्रबिंदू होता. यंदाच्या जागतिक मोहिमेची संकल्पना होती – “इनव्हेस्ट इन प्रीव्हेन्शन” आणि “स्टॉप ऑर्गनाइझड क्राईम”.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि व्याख्यानमालेच्या प्रमुख समन्वयक डॉ. अर्चना पत्की यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. IALSEचे अध्यक्ष डॉ. ए. राधाकृष्णन नायर यांनी अध्यक्षीय भाषणातून जीवनकौशल्य शिक्षणाची वाढती गरज अधोरेखित केली. यानंतर, सेवा मंडळ शिक्षण संस्थेचे मानद सचिव डॉ. भरत पाठक यांनी आपल्या विशेष भाषणात तरुणाईसमोरील व्यसनाधीनतेच्या वाढत्या समस्येवर चिंतनपर दृष्टिकोन सादर केला.
कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केरळ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) मोहनन कुन्नुम्मेल यांच्या प्रमुख व्याख्यानाने झाले. “ड्रग अॅब्यूज प्रिव्हेन्शन अँड मिटिगेशनला सक्षम करणारे जीवन कौशल्य” या विषयावरील त्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणात, त्यांनी अंमली पदार्थांच्या सामाजिक दबावांशी प्रभावीपणे लढण्यासाठी जीवनकौशल्य शिक्षणाचे सामर्थ्य अधोरेखित केले.
IALSEच्या सचिव सुश्री रमा भिडे यांनी सत्राचे सुत्रसंचालन केले. तर IALSEच्या उपाध्यक्षा डॉ. गौरी हर्डीकर यांनी सह-यजमानपद भूषवले आणि कार्यक्रमाचे प्रभावी संयोजन करत समृद्ध चर्चेला चालना दिली.
‘व्हॉइस ऑफ लाईफ’ व्याख्यानमाला ही एक दीर्घकालीन शैक्षणिक व सामाजिक उपक्रममालिका असून, कल्याण, कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि गंभीर सामाजिक विषयांवरील सक्रिय संवादाला चालना देणे हा तिचा प्रमुख उद्देश आहे.
या उद्घाटन सत्रातून जीवनकौशल्यांद्वारे समाजप्रबोधनाच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकले गेले. आयोजकांनी पुढील सत्रांतून विद्यार्थ्यांचा अधिक सक्रीय सहभाग आणि व्यापक सामाजिक संवाद घडवून आणण्याचा विश्वास व्यक्त केला.