रक्तदानाचे महत्त्व कृतीत उतरवणारे डॉ. प्रागजी वाजा आजच्या पिढीचे जिवंत आदर्श.!!!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या भावनेने प्रेरित होऊन, दादर रेल्वे स्थानकावर १२ जुलै २०२५ रोजी आयोजित रक्तदान शिबिरात लोकप्रिय डॉक्टर प्रागजी वाजा यांनी आपल्या जीवनातील १०८व्यांदा रक्तदान करून एक प्रेरणादायी इतिहास घडवला.
या शिबिरात बोलताना डॉ. वाजा म्हणाले, “रक्तदान हे केवळ परोपकार नव्हे, तर ते आरोग्यासही लाभदायक आहे. प्रत्येक नागरिकाने किमान सहा महिन्यांतून एकदा तरी रक्तदान अवश्य करावे. आपण दिलेले रक्त अवघ्या २४ तासांत शरीरात पुन्हा निर्माण होते. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात.”
या उपक्रमात २०० पेक्षा अधिक रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्यात आले. दरवर्षी सातत्याने पार पडणाऱ्या या शिबिरात यंदाही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. मा. नगरसेवक अनिल कोकीळ, सचिन पडवळ, नायर रुग्णालयाचे डॉ. गिरीश राजध्यक्ष, बबन गावकर, सुधीर साळवी, राम साळगावकर, साहित्यिक पत्रकार डॉ. अनुज केसरकर, साहित्यिका पूर्णिमा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सक्रिय सहभाग लाभला.
डॉ. वाजांचे रुग्णसेवेतील समर्पण आणि समाजकार्य हे पथदर्शी आहे. १०८ वेळा रक्तदान करून त्यांनी समाजापुढे एक विलक्षण आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या स्तुत्य कार्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या निरंतर प्रेरणादायी कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केली.
डॉ. वाजा यांना परिसरात “देवदूत” म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन, त्यांच्या असंख्य चाहत्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व शुभेच्छा व्यक्त केल्या.
हा रक्तदान उपक्रम केवळ रक्तदान नाही, तर मानवतेच्या मूल्यांचा जागर करणारा एक उत्सव ठरतो. अशा कृतीतून व्यक्त होणाऱ्या समाजभानामुळेच डॉ. प्रागजी वाजा हे आजच्या पिढीचे खरे जिवंत आदर्श ठरतात.