धुळे येथील सराईत गुन्हेगार मोटारसायकल चोरीप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
जळगाव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी मोठी कामगिरी बजावत धुळे येथील सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरी करणारे गुन्हेगार सक्रिय असल्याची खबर मिळाली. यानुसार पथक गठित करून पाचोरा शहरात सापळा रचण्यात आला.
या कारवाईत खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
1. शेख इमरान शेख रफिक (वय २४) – रा. ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव; सध्या रा. अंबिकानगर, शंभर फुटी रोड, धुळे.
2. शेख अकिल शेख शफिक (वय २७) – रा. जलाली मोहल्ला, भडगाव.
तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी भडगाव शहरातील विजय हॉटेलसमोर व खोल गल्लीतून HF Deluxe (हिरो कंपनी) व प्लॅटीना (बजाज कंपनी) अशा दोन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. भडगाव पोलीस स्टेशनवर यासंदर्भात गुन्हा क्र. २२६/२०२५ व २५०/२०२५, कलम BNS ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल आहेत.
पुढील चौकशीत आरोपी शेख इमरान याच्याकडे आणखी एक काळ्या रंगाची अॅक्टीव्हा सारखी मोपेड मोटारसायकल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, त्याच्यावर धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व मालाविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे.दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी भडगाव पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
सदर कारवाईत योगदान देणारे अधिकारी व कर्मचारी:पो.उ.नि. शेखर डोमाळे, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पो.हे.कॉ. संदीप पाटील, पो.ना. राहुल पाटील, पो.कॉ. जितेंद्र पाटील, पो.कॉ. भूषण पाटील.