कचऱ्यात सापडलेलं पिस्तूल! 12 वर्षीय मुलाच्या खेळण्यातून थरारक घटना.!!!
गोळी झाडली, सुदैवाने जीवितहानी नाही
कचऱ्यात सापडलेलं पिस्तूल! 12 वर्षीय मुलाच्या खेळण्यातून थरारक घटना.!!!
गोळी झाडली, सुदैवाने जीवितहानी नाही
मुंबई प्रतिनिधी :-
मुंबईच्या दहिसर पूर्वेतील साईकृपा चाळीजवळील मैदानात रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. अवघ्या 12 वर्षीय मुलाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात खरं पिस्तूल सापडलं. त्याने ते खेळणी समजून हाताळलं आणि चुकून ट्रिगर दाबल्याने धाडकन गोळी झाडली गेली. सुदैवानं, यात कोणतीही जखम किंवा जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तेथून पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पिस्तूल कोठून आलं, ते कोणाचं होत आणि त्याचा गुन्हेगारी वापर झाला का, याचा कसून तपास करत आहेत.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली असून, स्थानिक रहिवाशांचीही चौकशी केली जात आहे.
स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण
या प्रकारानं परिसरात भीती आणि चिंता पसरली आहे. खरी शस्त्रं कचऱ्यात कशी येतात? हा प्रश्न उभा राहिला आहे. संबंधित पिस्तूल जर कोणाच्या हातात गैरवापरासाठी गेलं असतं, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.
पोलीस तपासात काय पुढे येणार?
शस्त्र कचऱ्यात कसं आलं.? त्याचा कुठल्या गुन्ह्याशी संबंध आहे का.?पिस्तूल टाकणाऱ्याचा हेतू काय होता?या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी दहिसर पोलीस तपासात गुंतले आहेत.