हजारो वर्षांच्या श्रद्धेचा नवा अध्याय;आर्यादी श्री जनार्दन मंदिराचा भव्य जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न.!!!

0 182

हजारो वर्षांच्या श्रद्धेचा नवा अध्याय;आर्यादी श्री जनार्दन मंदिराचा भव्य जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न.!!!

पांगाला, उडुपी (कर्नाटक) (गुरुदत्त वाकदेकर) : उडुपी जिल्ह्यातील पांगाला, कापू येथे दहाव्या शतकापासून श्रद्धेचे केंद्र असलेल्या आर्यादी श्री जनार्दन मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनःप्रतिष्ठा सोहळा अतीव भक्तिभाव आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात पार पडला. पाच दिवस चाललेल्या या उत्सवात शास्त्रोक्त विधी, वैदिक पूजा-अर्चा, कलशारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले श्री माधवाचार्य मूळ महासंस्थान, आडामरू नरहरी तीर्थ मठाचे वेदमूर्ती श्री श्री श्री विश्वप्रिय तीर्थ श्रीपादेरु आणि सोदे वदिराजा मठाचे जगद्गुरू श्री श्री श्री विश्ववल्लभ तीर्थ श्रीपादेरु, ज्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशोत्सव विधी पार पडले.

कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश सौ. हेमावती, खासदार श्रीनिवास पुजारी, बंगळुरू येथील एम.आर.जी. समूहाचे प्रमुख डॉ. के. प्रकाश शेट्टी, आमदार सुरेश गुरमे-शेट्टी, योगेश व्ही. शेट्टी, डॉ. पी. मोहनदास भट, पी. गोविंद शेट्टी, बाळकृष्ण टी. शेट्टी, शैलेश शेट्टी आणि सुधीर शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. यासोबतच महाराष्ट्र, विशेषतः मुंबईहून आलेल्या हजारो भाविकांनीही सहभाग घेतला.

दंडतीर्थातील गुरुकुल परंपरा आणि माधव विजय पर्वात या मंदिराचा उल्लेख आढळतो. शतके उलटून गेली, तरीही येथील श्री जनार्दन मूर्तीच्या दर्शनाने मनःशांती आणि समाधान मिळते, अशी दृढ श्रद्धा आजही अबाधित आहे.

या भक्तिसंपन्न सोहळ्यामुळे पांगाला, कापू, पडबद्री, खटपडी आणि उडुपी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसरात्र चाललेल्या मंत्रोच्चारांनी परिसर पवित्रतेने भारून गेला होता. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी ही पर्वणी संस्मरणीय ठरली.

तसेच ही नव्या रूपात पुनरुत्थित झालेली परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीची वास्तू भाविकांच्या मनात नवचैतन्याचा दीप उजळून गेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!