महिलांमध्ये आणि तरुणांमध्ये लठ्ठपणामुळे वाढणाऱ्या कर्करोगाच्या घटनांकडे गंभीरतेने पाहण्याची गरज.!!!

डॉ. इंदू अंबूलकर, प्रमुख – मेडिकल ऑन्कोलॉजी, एचसीजी कर्करोग केंद्र, बोरिवली

0 142

महिलांमध्ये आणि तरुणांमध्ये लठ्ठपणामुळे वाढणाऱ्या कर्करोगाच्या घटनांकडे गंभीरतेने पाहण्याची गरज.!!!

 

डॉ. इंदू अंबूलकर, प्रमुख – मेडिकल ऑन्कोलॉजी, एचसीजी कर्करोग केंद्र, बोरिवली

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आज आपल्या समोर एक महत्वाचा आणि गंभीर विषय आहे – लठ्ठपणा आणि त्याचा महिलांमधील व तरुणांमधील कर्करोगाशी असलेला संबंध. कर्करोग होण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात, पण आता लठ्ठपणाही एक महत्वाचं कारण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

आता वैद्यकीय क्षेत्रात असं दिसतंय की अनेक महिला, विशेषतः गर्भधारणेच्या वयानंतर, स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत. हे दोन्ही कर्करोग हार्मोनच्या असंतुलनामुळे होतात. त्याचप्रमाणे २०–३० वयोगटातील तरुणांमध्ये आतड्याचा आणि पॅनक्रियाजचा कर्करोग वाढताना दिसतो आहे. या रुग्णांमध्ये कर्करोग वंशपरंपरागत नसून, लठ्ठपणा, हालचालींचा अभाव आणि अयोग्य आहार ही मुख्य कारणं आहेत.

लठ्ठपणाचा शरीरावर खोल परिणाम होतो. शरीरातील चरबी म्हणजे फक्त साठवलेली ऊर्जा नसून, ती हार्मोन्स (जसे की इस्ट्रोजेन) आणि सूज वाढवणारी रसायने तयार करते. त्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती बदलते. विशेषतः महिलांमध्ये चरबी वाढल्याने इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाच्या धोक्यावर होतो. याशिवाय, लठ्ठपणामुळे होणाऱ्या सूज आणि इन्सुलिन प्रतिकाराचा संबंध आतड्याच्या कर्करोगाशी स्पष्टपणे जोडला जातो.

या सगळ्यात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे लठ्ठपणाचा फटका लहान वयातील तरुणांना अधिक प्रमाणात बसत आहे. या वयोगटात कर्करोगाची नियमित तपासणी केली जात नाही. त्यामुळे थकवा, पचनाचे त्रास, अनियमित मासिक पाळी यासारखी लक्षणं दुर्लक्षित केली जातात आणि निदान उशिरा होतं.

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आता आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. कर्करोगापासून बचाव फक्त सिगारेट, तंबाखू किंवा प्रदूषण टाळण्यापुरता मर्यादित नसावा. योग्य वजन राखण्यासाठी लहान वयापासूनच चांगल्या सवयी लावल्या गेल्या पाहिजेत. शाळा, कॉलेज आणि समाजातील आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्ये यावर चर्चा झाली पाहिजे.

वैयक्तिक पातळीवर काही साधे उपाय करता येतात – रोजचा व्यायाम, ताजं आणि फायबरयुक्त अन्न, प्रोसेस्ड अन्न कमी करणे, तणाव टाळणे, सिगारेट आणि दारू टाळणे, आणि पुरेशी झोप घेणे. हे उपाय फक्त कर्करोगच नव्हे, तर इतर आजारांपासूनही बचाव करतात.

डॉक्टरांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायला हवा. किशोरवयीन, तरुण किंवा रजोनिवृत्तीनंतरच्या महिला – प्रत्येक रुग्णाला लठ्ठपणाचे धोके समजावून सांगण्याची जबाबदारी वैद्यक व्यावसायिकांनी घ्यायला हवी.

लठ्ठपणामुळे होणारा कर्करोग हा एक इशारा आहे. पण त्यात एक आशेचा किरण आहे – कारण लठ्ठपणा ही अशी गोष्ट आहे जी आपण नियंत्रित करू शकतो. योग्य माहिती, सतत जागरूकता, जीवनशैलीतील सकारात्मक बदल आणि वेळच्या वेळी तपासण्या करून आपण पुढच्या पिढीला या टाळता येणाऱ्या आजारांपासून वाचवू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा