सौगात-ए-मोदी’ योजना काय आहे, ईदच्या निमित्ताने 32 लाख मुस्लिमांना भाजप देणार भेट; किटमध्ये काय काय असेल.?
सौगात-ए-मोदी’ योजना काय आहे, ईदच्या निमित्ताने 32 लाख मुस्लिमांना भाजप देणार भेट ; किटमध्ये काय काय असेल.?
नवी दिल्ली
भारतीय जनता पक्ष (भाजप) देशभरातील 32 लाख मुस्लिम कुटुंबांना ईदच्या निमित्ताने भेट देणार आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाने ‘सौगात-ए-मोदी’ किट वाटण्याची घोषणा केली आहे.
ईदच्या निमित्ताने ही किट मशिदींच्या माध्यमातून गरजू मुस्लिमांमध्ये वाटली जाणार आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे 32000 पदाधिकारी 32000 मशिदींमध्ये पोहोचतील. येथूनच 32 लाख गरजू लोकांची ओळख पटवली जाणार आहे. त्यानंतर त्यांना ही मदत दिली जाणार आहे.
निजामुद्दीनमधून मोहिमेची सुरुवात
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील निजामुद्दीन येथून मंगळवारी या मोहिमेची सुरुवात होणार आहे. गरीब मुस्लिम कुटुंबांना कोणत्याही अडचणीशिवाय सण साजरा करता यावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत अल्पसंख्याक मोर्चाचे 32000 कार्यकर्ते देशभरातील 32000 मशिदींमध्ये जाऊन गरजू लोकांपर्यंत पोहोचतील.
साम्प्रदायिक सलोख्याला प्रोत्साहन दिले जाणार
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी म्हणाले की, रमजानच्या पवित्र महिन्यात गरीब, दुर्बळ शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना मदत करण्यावर जोर दिला जातो. ते म्हणाले की, मोर्चा गुड फ्रायडे, ईस्टर, नवरोज आणि भारतीय नववर्षामध्येही सहभागी होईल आणि ‘सौगात-ए-मोदी’ किट वितरित करेल. यामुळे साम्प्रदायिक सलोख्याला प्रोत्साहन मिळेल, असे मोर्चाने म्हटले आहे.
सौगात-ए-मोदी किटमध्ये काय काय आहे?
‘सौगात-ए-मोदी’ मोहिमेची घोषणा गेल्या रविवारीच करण्यात आली होती. किटमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंबरोबरच कपडे, शेवया, खजूर, सुकामेवा आणि साखर असेल. महिलांच्या किटमध्ये सूटचा कपडा असेल. तर, पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता-पायजामा असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक किटची किंमत सुमारे 500 ते 600 रुपये असेल. गरीब आणि गरजू मुस्लिमांनाही चांगल्या प्रकारे ईद साजरी करता यावी, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
जिल्हा स्तरावर होणार ईद मिलन समारंभ
जमाल सिद्दीकी म्हणाले की, जिल्हा स्तरावर ईद मिलन समारंभाचे आयोजनही केले जाईल. अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय माध्यम प्रभारी यासिर गिलानी म्हणाले की, ‘सौगात-ए-मोदी’ योजना भारतीय जनता पक्षाने मुस्लिम समुदायामध्ये कल्याणकारी योजनांना प्रोत्साहन देणे आणि भाजप व एनडीएसाठी राजकीय पाठिंबा मिळवणे या उद्देशाने सुरू केलेली मोहीम आहे. ही मोहीम रमजान आणि ईदवर केंद्रित आहे. त्यामुळे ही मोहीम खूप महत्त्वाची आहे.