अपात्र करण्याचं पाप करणार नाही, एकनाथ शिंदेंनी 2100 रुपयांबाबतही माहिती दिली.!!!
मुंबई :-
राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र राज्यात सरकार आल्यानंतर महायुतीने महिलांना पूर्वीप्रमाणेच 1500 रुपयांचा हप्ता दिला आहे.
2100 रुपये देण्यासंदर्भात अद्याप निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे लाभार्थी महिला 2100 रुपयांची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे निकष लावण्यात आल्याची चर्चा झाल्याची काही महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या दोन्ही गोष्टींवरून विरोधक सरकारवर टीका करताना दिसत आहेत. याचपार्श्भूमीवर आज (7 मार्च) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत, लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला. देशभरातील अनेक सरकारनी या योजनेचे अनुकरण केले. मात्र लाडकी बहीण या सुपरहिट योजनेबद्दल विरोधकांनी विषारी प्रचार केला. ज्या विरोधकांनी खोडा घातला त्या सावत्र भावांना बहिणींनी चांगला जोडा दाखवला. तरीही विरोधकांमध्ये सुधारणा होत नाही. आमच्यावर आरोप सुरुच आहेत. आमचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणी सावत्र झाल्या का? त्यांचे 2100 रुपये कधी देणार? योजनेतून बहिणींची नावे का वगळता? असे आरोप विरोधकांकडून आमच्यावर सुरू आहेत. मात्र आमच्या सरकारने लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदलले नाहीत. ज्या बहिणी पात्र आहेत, त्यांना अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, एवढी खात्री बाळगा, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेसाठी योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे. आता 1500 रुपयांची ओवाळणी 2100 रुपये कशी आणि कधी करायची याची आखणी शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही करत आहोत. आमचं सरकार प्रिटिंग मिस्टेकवालं नाही. आम्ही बोललो ते करणार आणि काटकसर करून जे करायचं ते करू. आपल्याला सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत. विकासकामे करायची आहेत. सगळं करत असताना जे बोललो ते करायचं आहे, असे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही ऐतिहासिक विकासाकामे आणि कल्याणकारी योजना आणल्या. त्यामुळे विकासकामांच्या जोरावर जनतेने आम्हाला मोठं यश मिळवून दिले. राज्य सरकारच्या कामावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे आम्ही निर्विवाद काम केल्यामुळे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता मिळण्याइतक्या जागाही मिळल्या नाहीत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांना लगावला.