अवैध रेती, खनिज वाहतुकीत महसूल मंत्र्यांपासून गृहमत्रांपर्यंत ‘देणे-घेणे’.?
सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर, जयंत पाटील.
अवैध रेती, खनिज वाहतुकीत महसूल मंत्र्यांपासून गृहमत्रांपर्यंत ‘देणे-घेणे’.?
सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर, जयंत पाटील.
भंडारा : मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्रात अवैधरित्या सुरु असलेले रेती, मॅगनीज व गौण खनिज वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी असे पत्र या क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी तहसिलदार यांना पाठवले आहे.
या पत्रात ” घाट चालवतांनी कोतवालापासुन ते जिल्हाधिकारी, महसुल मंत्री व खनिकर्म मंत्री यांच्यापर्यंत तसेच पोलीस शिपाई पासून ते पोलीस अधिक्षक, गृहमंत्री व मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांना देणे-घेणे करण्यात येते. त्यामुळे कुणीच आमचा बाल-वाका करु शकत नाही….” असा घणाघाती आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने त्यांच्याच युतीतील पक्ष श्रेष्ठीवर केल्याने खळबळ उडाली आहे.
जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राजू कारेमोरे यांचे पत्र वाचून दाखवत हे आरोप गंभीर असल्याचे लक्षात आणून दिले. आमदार कारेमोरे यांनी तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मोहाडी तालुक्यातील बेटाळा, निलज, कान्हळगाव, मुंढरी, मोहगाव देवी, पांजरा, रोहा या काही घाटावर रेती डेपो आहेत व काही घाटावर डेपो नाहीत. ज्या कोणी ठेकेदारांनी सदर डेपो किंवा घाट घेतलेले आहेत, ते फक्त नाममात्र आहेत. सदर संपूर्ण घाट व डेपो वैद्य पध्दतीने किंवा नियमानुसार न चालवता अवैद्य पध्दतीने व नियम धाब्यावर बसवून चालवत आहेत.
हे संपूर्ण घाट खनीज अधिकारी, कर्मचारी, आपण व आपले चेले-चपाटे चालवित आहेत. जनसामान्यात अशी सुध्दा चर्चा आहे की, घाट चालवतांनी कोतवालापासुन ते जिल्हाधिकारी, महसुल मंत्री व खनिकर्म मंत्री यांच्यापर्यंत तसेच पोलीस शिपाई पासुन ते पोलीस अधिक्षक, गृहमंत्री व मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांना देणे-घेणे करण्यात येते.
त्यामुळे कुणीच आमचा बाल-वाका करु शकत नाही. असे आपले चेले-चपाटे जनतेमध्ये सांगत असल्यामुळे शासनाची व जनप्रतिनीधींची जनतेमध्ये खुप बदनामी होत आहे. ‘ आमदार कारेमोरे यांच्या या आरोपांमुळे सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहे.
पत्रात पुढे लिहिले आहे की,
काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेवून मोठ्या प्रमाणात हे काळे काम चालत आहेत. त्यामुळे विधान सभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे. रेती, मॅगनीज गौण खनिज चोरी चे प्रमाण वाढलेले आहेत. दोन ते चार दिवसाआधी बेटाळा येथे लोकेश दशरथ बुधे या मुलाचा रेती घाटावर नरबळी देण्यात आलेला आहे, अशी सुध्दा चर्चा आहे. आपल्याकडून शासनाच्या जीआर यादी मागणी केली तरी सुध्दा आपण मला कुठल्याच प्रकारच्या जीआर किंवा यादी, घाटाबददल कुठलीच माहिती दिली नाही व जन प्रतिनिधींच्या आदेशाची अवहेलना करण्यात आली. शासनाचे सध्याचे वाळू धोरणाचे व डेपो चालविण्याबददल जे काही जीआर निघाले आहेत त्यांची संपुर्ण माहिती माझ्या कार्यालयाला दयावी अशी मागणी या पत्रातून कारेमोरे यांनी केली आहे. जर तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्र किंवा संपूर्ण भंडारा जिल्हयाला बिहार बनवायचे नसेल तर आपण वरील गैरप्रकार त्वरीत थांबवावे, भविष्यात एखादीं अप्रिय घटना घडली तर तहसीलदार सर्वस्वी जबाबदारी राहील अशी धमकीवजा मागणी या पत्रातून आमदार कारेमोरे यांनी आहे. या पत्राचे वाचन जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्यामुळे याचे काय पडसाद उमटणार हे लवकरच स्पष्ट होईल.