दिव्यांगांच्या रक्तदानातून समाजसेवेचा नवा आदर्श.!!!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दृष्टी फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि समाजासाठी आपली जबाबदारी पार पाडली. विशेष म्हणजे १३७ दिव्यांगांनी रक्तदान करून समाजासाठी आपल्या योगदानाची जाणीव करून दिली. या शिबिरात डॉक्टर प्रागजी वाझा यांनी १०७व्यांदा रक्तदान करून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
रक्तदानानंतर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा खऱ्या अर्थाने दिव्य आणि अद्भुत होता. दिव्यांगाचा उत्साह बघून संस्थेचे अध्यक्ष भरत गडा यांनी दर चार महिन्यांनी दिव्यांगासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
समाजसेवा आणि परोपकाराच्या या भावनेला पुढे नेत, दृष्टी फाउंडेशनच्या वतीने २,००० हून अधिक दिव्यांगांना महिनाभर पुरेल इतके रेशन वितरित करण्यात आले. ही सामाजिक उपक्रमाची मालिका गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी अविरत सुरू आहे.
समाजातील अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्था या उपक्रमाला सहकार्य करत असून, चक्षुदान मोहिमेच्या माध्यमातून अनेक दृष्टिहीनांना दृष्टी मिळवून देण्याचे कार्यही फाउंडेशन करत आहे. केवळ डोळे उपलब्ध करून देणे नाही, तर त्यासाठी लागणाऱ्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्चही संस्था उचलते. आतापर्यंत अनेक दृष्टिहीन व्यक्तींना नवी दृष्टी देऊन त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे कार्य दृष्टी फाउंडेशन करत आहे.
समाजातील प्रत्येकाने प्रेरणा घेण्यासारखी ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे, रक्तदान, नेत्रदान आणि समाजसेवेत सहभागी व्हावे!