तलाठ्यास सहा हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
तालुक्यातील शेवगे बुद्रुक सजाचे तलाठ्यास ६ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.महेशकुमार भाईदास सोनवणे (वय ५०) असे अटकेतील तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत तलाठी महेशकुमार सोनवणे यांनी एन ए झालेल्या शेतातील ९ प्लॉटवर नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून प्रत्येक नोंदीसाठी ११३० रुपये प्रमाणे एकूण १० हजार १७० रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ६ हजार रुपये देण्याचे ठरले.चाचपणीनंतर जळगाव एसीबीच्या पथकाने आज सदर लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहात पकडले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.सदरची कारवाई ही पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे,हवालदार किशोर महाजन,राकेश दुसाणे यांच्या पथकाने केली.