मोठी बातमी :महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये.? भाजपच्या मोठ्या नेत्याने दिले संकेत
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तरी निवडणूक ही दिवाळीनंतरच होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र, यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करताना पुढील दोन महिन्यात निवडणूक होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियानाची कार्यशाळा पुण्यात झाली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील दोन महिन्यात म्हणजे एप्रिल-मे महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवताना पुणे महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
बावनकुळे यांनी कमळ फुलवण्याचे आवाहन करत महापालिका निवडणूक युतीमध्ये न लढता स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. पुणे महापालिकेत भाजपपाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे पुणे महापालिका भाजप स्वबळावर लढला तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची स्वबळाची तयारी.?
भाजपच्या बैठकांमध्ये स्वबळाचा नारा दिला जातोय. तसे असेल तर शिवसेना देखील स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले होते. त्यामुळे संभाजीनगर महापालिका, मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिका शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा होती.