देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट 2.0 कार्यशाळा संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत स्कूल कनेक्ट २.० संपर्क अभियान कार्यशाळा संपन्न झाली.
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून करण्यात सुरू झाली आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि आमुलाग्र व्यापक बदल होत असताना त्याविषयी जनजागृती आणि सातत्यपूर्ण समुपदेशनाची गरज लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबतच्या सकारात्मक बाबी पोहोचविण्यासाठी शासन निर्णयान्वये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० स्कूल कनेक्ट २.० संपर्क अभियान कार्यशाळा राबविण्यात आली. आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय, लाडकूबाई कनिष्ठ महाविद्यालय आणि अंग्लो उर्दू हायस्कूलच्या नववी तेे बारावी पर्यंतच्या १४४ विद्यार्थ्यांनी आणि १२ शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला.
भारताला जागतिक ज्ञान महाशक्ती बनविण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलेले आहे, ते सांगण्यात आले. या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांची अद्वितीय क्षमता वाढविणे, पाठ्यक्रमाची लवचिकता, तर्कशील विचारशक्ती, बहुभाषिकता, रोजगार क्षमता यांमधील दुवा आणि समावेशिता यांवर भर देण्यात आलेला आहे, असे प्रतिपादन करण्यात आले. नवीन शिक्षण प्रणाली ५+३+३+४ ची प्रणाली सविस्तर समजावून सांगण्यात आली. या कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश, वैशिष्ट्ये, फायदे, श्रेयांक पद्धती, तीन व चार वर्षीय पदवी शिक्षण क्रम, मुख्य व गौण पदवी, शैक्षणिक श्रेय संरचना, मुख्य व गौण विषयांची जनरल, जनरल इलेक्ट्रिव व ओपन इलेक्टिव्ह विषयांची संकल्पना, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम व कौशल्यवर्धित रोजगाराच्या संधी, क्षमता विकास विषय, भारतीय ज्ञान प्रणाली, शाश्वत संस्कृतीसाठी मूल्याधिष्ठित शिक्षण, इंटर्नशिप, प्रकल्प व सह अभ्यासक्रम यांची उद्दिष्टे आणि फायदे यावर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनाने उपलब्ध केलेली साथी अर्थसाह्य योजना, शिष्यवृत्तीचे विविध प्रकार, ऑनलाइन शिक्षण घेण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेले विविध पोर्टल यांचीही माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेला संसाधन व्यक्ती म्हणून प्रा.डॉ. एस. डी. भैसे आणि डॉ. डी. ए. मस्की यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. डी. ए. मस्की यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी केले. डॉ. बी. एस. भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.