२६जानेवारीला राज्य सरकार मोठी घोषणा करणार,२१ नवीन जिल्हे होणार.?
महसूलमंत्र्यांनी केलं स्पष्ट
नागपूर :-
गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवीन २१ जिल्हे तयार होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत आहे.
तसेच २६ जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात येणार आहे. असं देखील या व्हायरल बातमीमध्ये सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरंच राज्यात २१ नवीन जिल्हे तयार होणार का.?
याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांवरचा वाढता ताण कमी करण्यासाठी काही जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे आस्थापना असा प्रस्ताव महसूल विभागाकडे आहे. असं देखील यावेळी बावनकुळे म्हणाले. ते आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे आलेला नाही मात्र याबाबत पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे.
अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना १०० दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत. असं माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
तसेच नागपूर जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती, संभाजीनगर, या जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना नेमण्याचा प्रस्ताव १०० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा विचार महसूल विभागाकडून करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.